Search This Blog

Welcome to Study247Ca !

Friday, 23 October 2026

प्रसंगलेखन : दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहा.

मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर. इयत्ता ९ वी - उपयोजित लेखन: प्रसंगलेखन (मी अनुभवलेली पहाट)

PM श्री न. प. राजेंद्र हायस्कूल, खापा

मार्गदर्शक इमरान खान सर डिजिटल मराठी अभ्यासक्रम | उपयोजित लेखन: निबंध लेखन (इयत्ता ९ वी)

प्रसंगलेखन : दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहा
विषय : मी अनुभवलेली पहाट (मुद्द्यांचे चक्र)
१. गावातील पहाट
२. आकाशदर्शन
३. शांततेचा अनुभव
४. डोंगरावर भ्रमंती
५. आल्हाददायक वातावरण
६. प्रसन्नता
७. पहाटेची भ्रमंती
८. मनाची तृप्ती व शांतता
मी अनुभवलेली पहाट

एकदा आम्ही गावी गेलो होतो. एके दिवशी पहाटे पहाटेच आईबाबा अंगणात बसले होते. मला जाग आली आणि मीही त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. बाहेर अजून काळोखच होता. पावसाळा संपल्यामुळे या वेळी आकाश निरभ्र होते. पहाट होऊ लागताच काळोखाचा पडदा विरविरित होत गेला आणि अस्पष्ट गोष्टी हळूहळू दिसू लागल्या; तेव्हा जाणवली ती आकाशातील पांढऱ्या ढगांची गडबड. एकमेकांना ढकलत प्रत्येक ढग पुढे येण्याचा प्रयत्न करीत होता. स्वच्छ निळे आकाश व त्या पार्श्वभूमीवर पांढरे ढग ही रंगसंगती खरोखरच आल्हाददायक होती. वाऱ्याची मंद, शीतल झुळूक शरीराला अलगद स्पर्श करीत होती. त्या लहरींनी मन सुखावले. ही पहाटेची प्रसन्न, शांत वेळ खरेच खूप प्रेरणादायक होती. म्हणूनच तर आपल्या पूर्वजांना वेद स्फुरले ते अशा पहाटेच्या वेळी!

मला त्या सकाळी सकाळीच फेरफटका मारण्याची लहर आली. मी आईबाबांना माझी कल्पना सांगितली. पण त्यांना तिथेच शांतपणे बसून त्या निसर्गदृश्याचा आस्वाद घेण्याची इच्छा झाली होती. पण मी त्यांना हातांना धरूनच उठवले. मग आईबाबा आणि मी फिरायला निघालो. जमीन गवताने व झाडावरून पडलेल्या पानांनी झाकली होती. चमकणारे दवबिंदू सगळीकडे दिसत होते. मी चपला काढून अनवाणी चालू लागलो. तो गवताचा लुसलुशीत ओलसर स्पर्श माझ्या पायांना सुखवीत होता. माझे पाहून आईबाबांनीही चपला काढल्या आणि तेही अनवाणी चालू लागले.

त्या वेळचे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. संपूर्ण डोंगरावर मखमली हिरवळ पसरली होती. अवघी वनश्रीच हिरव्या रंगाने नटलेली होती. लहानमोठे धबधबे उंच कड्यांवरून उड्या मारत खाली धावत होते. संपूर्ण हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढरेशुभ्र धबधबे आल्हाददायक वाटत होते. नद्या शांतपणे वाहत होत्या. त्यांच्या नितळ पाण्यात काठावरील झाडाझुडपांचे सुंदर प्रतिबिंब पडले होते. आकाशात पक्ष्यांची लगबग नुकतीच सुरू होत होती. या दृश्याने मन प्रसन्न झाले होते. प्रसन्न मनानेच आम्ही घरी परतलो. असा हा पहाटेचा अनुभव पुनःपुन्हा घ्यावा, असे मला सारखे वाटते.