Search This Blog

Welcome to Study247Ca !

Thursday, 9 July 2026

वर्ग 10वा आजी: कुटुंबाचं आगळ शब्दार्थ

मार्गदर्शक: श्री. इमरान खान सर. इयत्ता १० वी - मराठी शैक्षणिक ई-साहित्य

PM श्री न. प. राजेंद्र हायस्कूल, खापा

डिजिटल अभ्यासक्रम उपक्रम | ऑनलाईन शैक्षणिक ई-साहित्य - मार्गदर्शक : इमरान खान सर

विषय: मराठी (कुमारभारती) | वर्ग: १० वी
३. आजी : कुटुंबाचं आगळ (लेखक: महेंद्र कदम)

केंद्रीय विचार (Central Idea): प्रस्तुत पाठातून ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंबपद्धतीचे अनुपम दर्शन घडते. मानवी नातेसंबंध, त्यांतील सुरक्षितता, परस्परावलंबन आणि या सगळ्याचा मुख्य आधार असणारी कुटुंबप्रमुख आजी यांचे सुंदर वर्णन पाठात केले आहे. आजी म्हणजे जणू कुटुंबाचे संरक्षक 'आगळ' (कवच) होती.

पाठातील मुख्य घटकांचे विस्तृत विश्लेषण
१. आजीचे शब्दचित्र (दिसणे व राहणीमान)
  • आजीचे दिसणे: आजीची उंची जवळपास साडेपाच फूट होती. रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने तिची त्वचा रापलेली होती. सत्तरी ओलांडली तरी तिच्या हातात काठी आली नव्हती व पाठीचा कणा ताठ होता. तिचे सर्व दात मोत्यासारखे शाबूत व चमकदार होते आणि डोक्यावरील सर्व केस पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या असूनही तरुणपणाच्या सौंदर्याची ठेवण जाणवत असे.
  • आजीचे राहणीमान: आजी पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा वापरायची. ती अंगात चоळी आणि हिरवे व लाल अशा दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी नेसायची. कपाळावरचे गोंदण दिसू नये म्हणून ती त्यावर बुक्का लावायची.
२. आजीची शिस्त व कुटुंबावरील जरब
आजीची घरावर पूर्ण हुकूमत होती. तिने घरातील सर्व सुनांना कामाची रोटेशनप्रमाणे चोख वाटणी करून दिली होती. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, धुणं कुणी धुवायचं, कालवण आणि भांडी कुणी करायची हे ठरलेलं असायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष होता; काम येत नसेल तिला ती स्वतः शिकवायची. भाकरी करपली की करणारणीला आजीकडून लाखोली मिळत असे.
३. दुधाचा कडक पहारा व बालपण
घरात गावरान कपिली गाय भरपूर दूध द्यायची. वडील किंवा काकांनी धार काढली की, लेखकाची बाळगोपाळांची पंगत गोठ्यातच ग्लास घेऊन बसायची. तिथंच धारोष्ण उबदार दूध ग्लासात मिळायचे आणि ते मिश्या येईपर्यंत पिण्याचा आनंद वेगळाच असायचा. आजीचा गोठ्यात बसून सक्त पहारा असायचा, कारण चार घरच्या चार सुना आल्यावर कोणत्या लेकराला कमी-जास्त मिळू नये यावर तिचा कटाक्ष होता.
४. ढाळज : गावाचे वर्तमानपत्र
दुपारी मुलांना शाळेत पिटाळल्यानंतर आजीची स्वारी ढाळजंत विश्रांतीसाठी यायची. गल्लीतल्या बायका तिथे वाकळ शिवणे, शेंगा फोडणे, धान्य निवडणे अशी कामे घेऊन जमायच्या आणि काम करता करता गप्पागोष्टी, सासुरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा रंगायच्या. ढाळज हे गावाचे जणू वर्तमानपत्र होते, कारण गावातील सर्व घडामोडी व बातम्या तिथे यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. आजी या वर्तमानपत्राची मुख्य संपादक होती.
५. आगळ : वाड्याचे संरक्षक कवच
आगळ म्हणजे सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी लाकडी अडसर, जी वाड्याच्या मुख्य दरवाजाला बंद करण्यासाठी आतल्या बाजूने एका भिंतीतल्या देवळीत आरपार घातली जायची. ती बाहेर ओढणे व भिंतीत ढकलणे हे लहान मुलांसाठी मोठे अवघड गणित (दिव्य) असायचे. एकदा रात्री किंवा दुपारी आगळ टाकली की वाडा शांत, सुरक्षित आणि उन्हापासून संरक्षित व्हायचा. ही आगळ वाड्याचे आणि आजी कुटुंबाचे भरभक्कम संरक्षक कवच होते.
व्याकरण व शब्दसंपत्ती विभाग
(अ) समानार्थी शब्द
शब्द (Word) समानार्थी अर्थ (Synonyms)
आगळदरवाजाचा भक्कम लाकडी अडसर
ढाळजवाड्यातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील पडवी किंवा देवडी
हुकूमतअधिकार, सत्ता, जरब
कवचरक्षण करणारे साधन, ढाल
कटाक्षविशेष लक्ष, रोख
सावधजागृत, सतर्क
रानमेवारानात मिळणारी नैसर्गिक फळे
भरवसाविश्वास, खात्री
चरवीदूध काढण्याचे उभट तांब्यासारखे भांडे
सरपणजळाऊ लाकडे
(आ) विरुद्धार्थी शब्द
शब्द विरुद्धार्थी शब्द
आळसउत्साह
आदरअनादर
आस्थाअनास्था
आपुलकीदुरावा
सुरक्षितताअसुरक्षितता
सावधबेसावध
थोरलीधाकटी
(इ) वाक्प्रचार व त्यांचा वाक्यात उपयोग
१. कटाक्ष असणे (विशेष लक्ष असणे)
वाक्यात उपयोग: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे व शिस्तीकडे वर्गशिक्षकांचा नेहमी कटाक्ष असतो.
२. कानोसा घेणे (अंदाज घेणे / गुपचूप ऐकणे)
वाक्यात उपयोग: रात्रीच्या शांततेत घरात काही आवाज येतो का, याचा आजीने कानोसा घेतला.
३. हुकमत गाजवणे (अधिकार गाजवणे)
वाक्यात उपयोग: कुटुंबात सर्वांवर हुकमत गाजवण्यापेक्षा प्रेमाने वागल्यास नातेसंबंध दृढ होतात.
४. लाखोली वाहणे (खूप शिव्या देणे / दुषणे देणे)
वाक्यात उपयोग: नोकराकडून काचेचे किमती भांडे फुटताच मालकिणीने त्याला लाखोली वाहिली.
५. सटकी मारणे (गुपचूप निसटून जाणे / पळून जाणे)
वाक्यात उपयोग: दुपारच्या वेळी आजी झोपली आहे हे पाहून राजूने गोट्या खेळण्यासाठी घरातून सटकी मारली.
६. गुण्यागोविंदाने नांदणे (सुखाने व आनंदाने एकत्र राहणे)
वाक्यात उपयोग: लेखकाचे संपूर्ण कुटुंब आजीच्या छत्रछायेखाली गुण्यागोविंदाने नांदत होते.
पाठ्यपुस्तकातील संपूर्ण स्वाध्याय (उत्तरांसह)
प्र. १. पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा.
  • बैठे खेळ (Indoor Games): चिंचोके, गजगे, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळू मुंगळा.
  • मैदानी खेळ (Outdoor Games): विटी-दांडू, भोवरा, गोट्या, कुरीचा डाव, वडाच्या पारंब्यांना लोंबकळणे, विहिरीत मनसोक्त पोहणे, शिवणापानी.
प्र. २. खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा (शब्दभेद).
  • वर: (१) लग्न ठरेलला पुरुष (नवरदेव) / (२) वरची दिशा किंवा वरदान.
  • ग्रह: (१) सूर्यमालेतील खगोलीय गोल (पृथ्वी, मंगळ इ.) / (२) मनातील समजूत किंवा गैरसमज.
  • काठ: (१) नदी किंवा विहिरीचा किनारा / (२) साडीची किनार.
  • अभंग: (१) कधीही न भंग पावणारा, अखंड / (२) मराठी साहित्यातील संतांचा एक काव्यप्रकार.
प्र. ३. पाठात आलेला 'रानमेवा' स्पष्ट करा.
लेखकाच्या बालपणात निसर्गाकडून मिळणाऱ्या अनेक गोष्टी पोटात जात होत्या. यामध्ये गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचांचा तौर, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणसं, गहू-ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेण्ण्या, कलिंगडं, शेंदाडं, करडीची व पात्रंची भाजी आणि कवटं यांचा समावेश होता. यालाच पाठात 'रानमेवा' म्हटले आहे.
स्वमत व अभिव्यक्ती (बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे)
प्र. १. 'आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं' या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
ग्रामीण भागात पूर्वी करमणुकीची किंवा संवादाची आधुनिक साधने नव्हती. दुपारी शेतातील कामे संपवून घरातील मुले शाळेत गेली की गल्लीतल्या सर्व बायका आपापली कामे (वाकळ शिवणे, धान्य निवडणे इ.) घेऊन लेखकाच्या वाड्याच्या ढाळजंत जमायच्या. तिथे काम करता करता गल्लीतील व गावातील सर्व घडामोडी, सुख-दुःखाच्या गप्पा, सासुरवासाच्या गोष्टी यांवर चर्चा व्हायची. गावात घडलेली कोणतीही गोष्ट आधी ढाळजंत यायची, तिथे तिची शहानिशा व्हायची आणि मग ती गावभर पसरायची. ज्याप्रमाणे वर्तमानपत्रात सर्व प्रकारच्या बातम्या एकत्र येतात, त्याचप्रमाणे या ढाळजंत गावातील सर्व घडामोडी एकत्र येत, म्हणून ढाळजला गावाचे वर्तमानपत्र आणि आजीला त्याची संपादक म्हटले आहे.
प्र. २. पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा.
'आजी : कुटुंबाचं आगळ' या पाठात ग्रामीण भागातील एकत्र कुटुंबपद्धतीचे अतिशय आदर्श आणि सुंदर चित्र रेखाटले आहे. आजच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मानवी नातेसंबंधांमधील जिव्हाळा कमी होत चालला आहे. एकत्र कुटुंबात आजीसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचे छत्र लाभल्यामुळे मुलांवर लहानपणापासूनच आपोआप चांगले संस्कार होतात. कुटुंबातील सुख-दुःखात सर्वजण एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात, ज्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होते. कामांची समान वाटणी केल्यामुळे कुणावरही अतिरिक्त ताण पडत नाही. बालपणात निसर्गाच्या सान्निध्यात खेळायला मिळणे आणि सर्वांच्या मायेच्या सावलीत मोठे होणे हा आनंद एकत्र कुटुंब पद्धतीतच मिळू शकतो. माझ्या मते, कौटुंबिक स्थैर्य आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी एकत्र कुटुंब पद्धती अत्यंत गरजेची आहे.
प्र. ३. 'पाठाच्या शीर्षकाची (आजी : कुटुंबाचं आगळ) समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा'.
'आगळ' म्हणजे जुन्या काळातील वाड्याच्या दिंडी दरवाजाला आतून लावला जाणारा एक भक्कम आणि मजबूत सागवानी लाकडाचा अडसर. एकदा का आगळ लावली की वाड्यात राहणारे सर्व लोक बाहेरील धोके, चोऱ्या आणि संकटांपासून पूर्णपणे सुरक्षित व्हायचे. प्रस्तुत पाठात आजीची भूमिका देखील अगदी तशीच आहे. आजीच्या कडक शिस्तीमुळे आणि जरबेमुळे कुटुंबात कधीही विस्कळीतपणा आला नाही. तिने सर्व सुनांना आणि नातवंडांना समान न्याय व प्रेम दिले. आजीच्या छत्रछायेखाली संपूर्ण कुटुंब सुरक्षित आणि गुण्यागोविंदाने नांदत होते. ज्याप्रमाणे आगळ वाड्याचे संरक्षण करायची, त्याचप्रमाणे आजी कुटुंबाचे बाहेरील जगापासून आणि अंतर्गत वादांपासून रक्षण करायची. म्हणूनच या पाठाला दिलेले 'आजी : कुटुंबाचं आगळ' हे शीर्षक अत्यंत सार्थ आणि समर्पक आहे.